– महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणांतर्गत महिलांसाठी स्वच्छता आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी घोषणा केली की, आतापासून राज्य महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर सुसज्ज शौचालये बांधली जातील. जेणेकरून महिलांना प्रवास करताना स्वच्छतेच्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये.
या स्वच्छता गृहांची देखभाल आणि व्यवस्थापन स्थानिक महिला बचत गटांकडून केले जाईल, ज्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि स्वच्छतेचा स्तरही सुधारेल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. याशिवाय, या बचत गटांना त्यांची उत्पादने महामार्गांवर विकण्याची व्यवस्था देखील केली जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होईल.
महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आश्वासन दिले की हा उपक्रम महिलांच्या सुरक्षितता आणि सोयी लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणालाही चालना मिळेल. महिला आणि बालविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला जाईल.
ही शौचालये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधली जातील तर त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटांकडून केले जाईल. राज्यातील महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.