नागपूर : यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान करणा-या सोसायटींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोसायटींसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१५) कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये रहिवासी सोसायटींच्या प्रतिनिधींनी मतदानाची शपथ घेतली.
याप्रसंगी मनपाच्या निवडणूक नोडल अधिकारी उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. प्रकाश वराडे, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, गणेश राठोड, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.
कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित रहिवासी सोसायटींच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा यांनी मतदान शपथ दिली. २०१९ च्या तुलनेत यावर्षी जास्तीत जास्त मतदान करून नागपूर शहरातील मतदानाचे प्रमाण वाढविण्याचेही त्यांनी आवाहन केले. मतदार यादी नाव शोधणे तसेच मतदान बुथ शोधण्यासाठी वोटर सर्चिंग ॲप चा उपयोग करणे तसेच 8600004746 या क्रमांवर पूर्ण नाव व पत्ता व्हॅट्सॲप करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरातील फ्लॅट, अपार्टमेंट, हाउसिंग सोसायटींसाठी तीन गटात मतदार स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये ५० पर्यंत कुटुंब संख्या असलेल्या सोसायटी, ५० पेक्षा जास्त आणि १०० पेक्षा कमी कुटुंब संख्या असलेल्या सोसायटी आणि १०० पेक्षा जास्त कुटुंब संख्या असलेल्या सोसायटी असे स्पर्धेसाठी तीन गट करण्यात आलेले आहे. प्रत्येक सोसायटीतील मतदार यादीत नाव असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींनी मतदान करणे अनिवार्य आहे.
ज्या सोसायटीमधील सर्वाधिक मतदार मतदान करतील त्या सोसायटींना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये नोंदणी करण्यासाठी मनपा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत गुगल लिंक व क्यूआर कोड तयार करण्यात आले आहे. यावर नोंदणी करताना अडचण निर्माण झाल्यास sveepngp2024@gmail.com या ई-मेल आयडीवर अडचण नोंदवावी. स्पर्धेची अंतिम तारीख २१ एप्रिल असून जास्तीत जास्त सोसायटींनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले.