नागपूर: नंदनवन येथील शिवमंदिराचा डीपीआर पुन्हा तयार करून संपूर्ण प्रस्ताव 7 दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपाला दिले. आ. कृष्णा खोपडे यांनी हा विषय उपस्थित केला होता. 2 वर्षापूर्वीच डीपीआर तयार करण्यात आला होता. 4 महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात 7 दिवसात डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण कोणतीही कारवाई झाली नाही, याकडे आ. खोपडे यांनी लक्ष वेधले. मंदिराजवळ ज्या जागेवर अतिक्रमण आहे, तेवढी जागा सोडून अन्य जागेचा डीपीआर केला असता तरी होऊ शकले असते. मनपाच्या नगररचना विभागाकडून तपासून 7 दिवसात प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रंजना किरणापुरे यांना नोकरी
कोराडीच्या महानिर्मिती वीज प्रक़ल्पात रंजना अशोक किरणापुरे यांचे घर गेले असताना त्यांना नोकरी न मिळता दुसर्या व्यक्तीस नोकरी देण्यात आले. रंजना किरणापुरे आणि ज्यांना नोकरी मिळाली आहे, अशा दोघांकडेही प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र आहे. किरणापुरे वगळता दुसर्या प्रक़ल्पग्रस्ताने प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली. यावर आता रंजना किरणापुरे यांनी आक्षेप घेतला आहे. दोन्ही प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त म्हणून जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. मात्र एका घरासाठी एकाच व्यक्तीला नोकरी देता येते, या नियमानुसार कुणाला एकालाच नोकरी मिळणार आहे. या प्रक़रणी जिल्हाधिकार्यांकडे किरणापुरे यांनी जावे आणि कोणते प्रमाणपत्र ग्राह्य धरायचे हे ठरवून पत्र आणावे असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सुचवले.
मनपा सिविक सेंटर
मनपाच्या लकडगंज झोनच्या मागे 5 एकर जागा सिविक सेंटरसाठी ठेवण्यात आली आहे. या संदर्भात आ. खोपडे यांनी सांगितले की, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष गोपाल ग्वालानी यांनी हा प्रक़ल्प आणला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सिविक सेंटरच्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. 2015 मध्ये स्थगिती हटली. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. या जागेचे भिजत घोंगडे मनपाने कायम ठेवले होते. येत्या 15 दिवसात या प्रकल्पासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.