मुंबई: वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काल वृक्षलागवड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. परिषदेस ग्रामविकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे , पदुममंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
परिषदेत चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करणाऱ्या नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री मुनगंटीवार म्हणाले की ४ जुलै २०१८ पासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असले तरी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमात आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यक्रम आयोजित करून त्यात सहभागी व्हावे.
शक्य होतील तेवढे कार्यक्रम आयोजित करून वृक्षलागवडीसाठी लोकांना प्रेरित करावे. महावृक्षलागवडीचे हे मिशन यशस्वी व्हावे यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून २५ लाख रुपयांपर्यंतचा निधी वृक्षलागवड आणि जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी खर्च करता येणार आहे. सामाजिक वनीकरण शाखेच्या साह्याने रोहयोअंतर्गत फळबाग लागवड करता येणार आहे, रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीची वैयक्तिक लाभधारकांसाठीची क्षेत्र मर्यादा कोकणासाठी १० हेक्टर असून उर्वरित महाराष्ट्रासाठी ती ४ हेक्टरवरून ६ हेक्टर एवढी वाढविण्यात आली आहे.
ते म्हणाले की, हे सर्वांनी मिळून उचलायचे “वृक्षधनुष्य” आहे. जगातील सर्वात मोठी ५१ लाखांची हरितसेना आपण निर्माण करू शकलो आहोत. आपले उद्दिष्ट १ कोटीचे आहे ते ही आपण लवकरच साध्य करू. “१९२६ हॅलो फॉरेस्ट” ही हेल्पलाईन कार्यरत केल्याचे ही त्यांनी सांगितले. या सर्व माध्यमातून “मन की बात के साथ आपल्याला वन की बात” ही करायची आहे. पर्यावरणाने याआधीच धोक्याची सूचना दिली आहे ती समजून घेण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही यात दडली आहेत. फळझाड लागवडीतून, बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाची पर्यायी साधने ही उपलब्ध करुन देता येतील त्यादृष्टीने ही वृक्षलागवडीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. स्वच्छ गावे-हरित गावे, स्वच्छ शहरे- हरित शहरे या संकल्पनेवर देखील शासन काम करत आहे. रानमळाच्या धर्तीवर वृक्षलागवडीचा नवा पायंडा राज्यात राबविण्यात येत आहे असे सांगून त्यांनी जीवनातील प्रत्येक प्रसंग वृक्षाच्या रूपाने चिरंतन करता येऊ शकेल असे आवाहन ही केले.
वृक्षलागवड कार्यक्रमासाठी फक्त शुभेच्छा नाही तर प्रत्यक्ष सहभाग
वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी फक्त शुभेच्छा नाही तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन काम करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, वृक्षलागवडीसारख्या विषयाला एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम सुधीर मुनगंटीवार यांनी केले असून हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन त्यांनी काम सुरू केले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, पैसे मोजणारे अर्थमंत्री आपण खूप पाहिले पण पैशाबरोबर झाडे लावून त्याची मोजणी करणारा अर्थमंत्री आपण सर्वजण पहिल्यांदाच पाहत आहोत. पाणी आणि मातीचे संवर्धन केले तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात हे लक्षात घेऊन सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीतून समाजाची निरोगी जीवनाबरोबर रोजगाराशी सांगड घातली आहे.
रोपांचा वृक्ष होताना पाहणे ही खूप आंनददायी भावना आहे असे सांगून त्या म्हणाल्या की “माझी कन्या भाग्यश्री” आणि वृक्षलागवड याची भविष्यात जोडणी करावी. जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे फळबाग लागवड केल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न मुलीच्या नावावर जमा करता येऊ शकेल, असाच विचार अंगणवाडी मधील बालकांच्या बाबतीत ही करता येईल, त्यादृष्टीनंही वन विभागाने विचार करावा.
राज्यात सध्या १३ कोटी वृक्षलागवडीसाठी २४ कोटी ६७ लाख रोपे उपलब्ध आहेत, वृक्षलागवडीसाठी जवळपास ११ कोटी खड्डे तयार आहेत, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा वन अधिकाऱ्याच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्याकडे जाऊन वृक्ष लावणाऱ्यांनी आपली माहिती नोंदवावी असे आवाहन वन सचिव विकास खारगे यांनी केले. वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या वृक्षलागवडीची नोंद वन विभागाकडे करता यावी यासाठी “माय प्लांट” नावाचे मोबाईल ॲप विकसित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.