‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला
नागपूर : आज शहरातील कोरोनाबाधितांची रोजची वाढती संख्या ही प्रत्येकासाठी चिंतेची बाब झाली आहे. मात्र या परिस्थितीला आपली बेजबाबदार वागणूक जबाबदार आहे. सुरूवातीपासून आज वर्षभरानंतरही सर्व स्तरातून सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग या त्रीसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या सर्व गोष्टींकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केले जात आहे. मास्क हे कोरोनापासून बचावाचे सर्वात उत्तम शस्त्र आहे. मात्र ते व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे. तोंड व नाक पूर्णपणे झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क लावा. कोरोनाबाधितांची सेवा करणारे अनेक जण आजपर्यंत कोरोनापासून दूर राहिले आहेत, ते केवळ मास्कमुळेच. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योग्यरित्या मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद मुंद्रा व प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. अभिजीत अंभईकर यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरूवारी (ता.३१) डॉ. प्रमोद मुंद्रा आणि डॉ. अभिजीत अंभईकर यांचे ‘हृदयरोग आणि कोव्हिड’ या विषयावर मार्गदर्शन केले व नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देउन शंकांचे निरसरन केले.
कोव्हिड झाल्यानंतर अनेकांना हृदयरोगाचा धोका संभवतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतर आयसोलेशनचा निर्धारित कालावधी पूर्ण केल्यानंतर अनेकांना हृदयरोगाची समस्या निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले. कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्याचा प्रभाव हृदयासह इतर अवयवांवरही पडतो. ज्यांना आधीच हृदयविकाराचा आजार आहे, त्यांनी याबाबत अधिक सजग राहावे. त्यांची नियमित औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी. कोरोनामधून बरे झाल्यानंतर हृदरोगींसह इतरांनीही किमान चार आठवडे सावधगीरी बाळगावी. नियमित डॉक्टरांच्या संपर्कात रहावे, त्यांना प्रकृतीची माहिती देत राहावी, असेही आवाहन डॉ. प्रमोद मुंद्रा व डॉ. अभिजीत अंभईकर यांनी केले आहे.
कोरोना झालेले अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर चक्कर येउन पडणे आदी बाबत तक्रारी येत असल्याचे डॉ. प्रमोद मुंद्रा यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीरात ‘डिहायड्रेशन’चे प्रमाण वाढते. परिणामी चक्कर येउन पडणे, गळा सुखणे अशा बाबी घडतात. त्यामुळे बरे झाल्यानंतरही डॉक्टरांना प्रकृतीची माहिती देउन त्यांचा नियमित सल्ला घेत राहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आजच्या या संकटाच्या परिस्थितीत आपल्याकडे उपलब्ध असणारी लस ही दिलासादायक बाब आहे. लसीकरणासंदर्भात अनेकांच्या मनात अनेक शंका व संभ्रम आहेत. त्याबाबत अनेक संदेशही सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा संदेशांकडे, संभ्रमांकडे दुर्लक्ष करणे, हेच उत्तम. कारण लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. लस आपल्याला कोरोनापासून शंभर टक्के वाचवत नसली तरी कोरोनाचा आपल्या शरीरावर होणार प्रभाव नगण्य करतो. त्यामुळे ज्यांच्यासाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे, त्यांनी आवर्जुन घ्यावे, असे आवाहन डॉ. अभिजीत अंभईकर यांनी केले.
हृदयरोगींनी लस घ्यावी का, या प्रश्नावर बोलताना दोन्ही तज्ज्ञांनी सांगितले की, ज्यांना हृदयामध्ये ‘क्रिटिकल’ स्वरूपात ‘ब्लॉकेज’ आहेत अशांना एंजोप्लॉस्टी अथवा सर्जरी करणे आवश्यक असेल पण तो रुग्ण कोरोना बाधित असेल अशा वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी शक्य असल्यास डॉक्टर शस्त्रक्रिया पुढे ढकलतात किंवा अत्यावश्यक असल्यास संपूर्ण सुरक्षा ठेवून शस्त्रक्रिया केली जाते. कोव्हिड लस ही सर्वांनी घेणे आवश्यक आहे. हृदय रुग्णांनी त्यांच्या नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे, ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया अथवा एंजोप्लॉस्टी झालेली आहे अशांनी तसेच नुकताच हृदयविकाराचा धक्का आलेल्यांनी १५ ते २० दिवसाच्या कालावधीनंतर डॉक्टरांच्या सल्लाने लस घेणे उत्तम राहिल, असाही सल्ला डॉ. प्रमोद मुंद्रा व प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. अभिजीत अंभईकर यांनी दिला.