सहा महिन्यांपासून होमियोप्याथी गोळ्यांचे निःशुल्क वाटप ः डॉ. राजेश मुरकुटेंच्या मोहिमेने वाढला आत्मविश्वास
नागपूर : कोरोनाने संपूर्ण यंत्रणा हादरली असून बाधितांमध्ये मृत्यूचे भय पसरले आहे. याच भयग्रस्त वातावरणात डॉ. राजेश मुरकुटे गरीबांत मोफत कोरोनापासून बचावासाठी होमियोप्याथी गोळ्यांचे वाटप करीत करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते स्वतःचे क्लिनिक सांभाळत ही मोहिम राबवित आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनला दर महिन्याला ते आवश्यक तेवढ्या गोळ्या पुरवित असल्याने कोरोना लढ्यात पोलिस हिमतीने आघाडीवर दिसून येत आहे.
शहरात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून शहरातील पोलिसांच्या बचावासाठी डॉ. राजेश मुरकुटे त्यांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या होमियोप्याथी गोळ्यांचे वाटप करीत आहेत. सुरुवातीला महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही त्यांनी होमियोप्या थी गोळ्यांचे डोज दिले. पोलिसांना औषध देण्याची त्यांची मोहिम अद्यापही सुरू आहे. शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये गोळ्यांचे वाटप केल्यानंतर नुकताच त्यांनी भरोसा सेलमध्येही गोळ्यांचे वितरण केले. महाल, सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. आंबेडकर चौक आणि बर्डी येथील तीन क्लिनिकचा भार सांभाळतानाच ते १२ ते १३ तास रुग्णाची सेवा करतात .
शहरातील मोठे उद्योजक, पोलिस व इतर विभागातील उच्चपदस्थ अधिकारी त्याच्याकडून नियमित आरोग्याचा सल्ला तसेच औषधी घेतात. उद्योजक, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा उपचार करतानाच डॉ. मुरकुटे गरीबांसाठीही तेवढ्याच मायेने वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्य क्लिनिकमध्ये उद्योजक, अधिकाऱ्यांप्रमाणे गरीब नागरिकही जातात. अनेकदा या गरीबांकडे औषधोपचारासाठी पैसेही नसते. अशा गरीबांना ते मोफत उपचार करतातच. शिवाय आता कोरोनाच्या काळात येणाऱ्या प्रत्येक गरीबाला ते रोग प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या देत आहेत. काही गरीब पैसे देण्याचा प्रयत्न करतात.
परंतु त्याची परिस्थिती बघता ते त्याला परत करतात. एवढेच नव्हे एखादा गंभीर गरीब रुग्ण असेल तर फळ आदी खरेदीसाठी जवळचे पैसेही देऊन माणुसकी जपत आहेत. कोरोनाच्या काळात गरीबांना मदतीदरम्यान स्वतःला कोरोनाची लागण होईल, याकडेही ते दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कोरोना होईल, या भीतीने काम केले तर लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भीती न बाळगता गरजूंना आनंदाने सेवा देत असल्याचे डॉ. मुरकुटे यांनी सांगितले.
माफक दरात उपचारासाठी हॉस्पिटलचा प्रयत्न
शहरात हॉस्पिटल्सच्या बाबत पूर्व नागपूर खूप माघारलेले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गरीब नागरिक आहेत. त्यांना माफक दरात किंवा खूपच गरीब असेल तर मोफतही आरोग्य सेवा देता यावी, यासाठी हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. मुरकुटे यांनी नमुद केले.