strong>नागपूर: दीक्षाभूमीचा विकास करण्याची मागणी स्मारक समितीकडून करण्यात येत होती. त्याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने आम्हाला प्रस्ताव पाठवला, त्यानुसार आम्ही विकास व सुशोभीकरणासाठी निधी दिला. मात्र काल दीक्षाभूमीच्या भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावरून आंबेडकर अनुयायांनी आंदोलन करत बांधकामाची तोडफोड केली. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अनेकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आंदोलनकर्ते व समितीने बसून निर्णय घ्यावा. शासन निर्णयानुसार काम करेल, असे फडणवीस म्हणाले.
दीक्षा भूमीचा विकास आमच्या आधीच्या सरकारच्या काळात झाला. आम्ही विकासाबद्दल बोललो होतो. मात्र, त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. विकासाबाबत समितीने चर्चा केली आहे. आम्ही तयारी केली आहे. त्याची ब्लू प्रिंट काढून सरकारकडे पाठवली आणि त्यानुसार विकासासाठी निधी दिला, असे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारने दीक्षाभूमीच्या विकासाची आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेतली होती. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. गेल्या वर्षी बांधकामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात दीक्षाभूमीची पार्किंग आणि सुरक्षा भिंत बांधण्यात येत होती. मात्र, बांधकामाबाबत आंदोलनेही झाली.
सोमवारी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर पोहोचून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला हळूहळू हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आधी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची तोडफोड केली आणि नंतर ती पेटवून दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.ही हालचाल पाहून पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.सर्वसामान्यांची संमती न घेता बांधकाम सुरू करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.