नागपूर :शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे माउंट मकालु शिखर सर करत नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ननवरे हे मुळ मु.पो. कोंढेज, तह. करमाळा, जि. सोलापुर येथील राहीवासी आहेत. त्यांनी दिनांक ३० मे २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. जगातील पाचव्या उंच ठिकाणी माऊंट मकालु शिखर सर केले.
माउंट मकालु हे जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील हे शिखर ८४८५ मीटर उंचीचे असून, नेपाळ-चीन सिमेवर स्थित आहे.हे शिखर चढाईस अत्यंत खडतर आहे. खडकाळ भाग जास्त आहे त्यामुळे, ७,००० मीटर उंचीनंतर चढाईस खुपच त्रास होतो. म्हणून बरेच गिर्यारोहक याकडे पाठ फिरवतात. यावर्षी ३६ गिर्यारोहकांना चढाईसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, त्यापैकी फक्त ९ गिर्यारोहकांना शिखरावरती पोहचता आले. त्यामध्ये भारतातून शिवाजी ननवरे यशस्वी ठरले. महाराष्ट्र पोलीस दलातून यापूर्वी कोणीही हे शिखर सर केले नसल्याने महाराष्ट्र पोलीसांची प्रतीमा देशभरात उंचावली आहे.
शिवाजी ननवरे यांना सन २०१८ साली पोलीस महासंचालक पदक, २०१९ साली केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षापदक तसेच, खडतर सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
या कामगिरीसाठी. शिवाजी ननवरे यांना नागपूर शहर पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त श्रीमती अस्वती दोर्जे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) निमित गोयल व मा. पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) श्रीमती पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
या वर्षी सततच्या बदलत्या हवामानामुळे हे शिखर सर करण्यासाठी ५५ दिवसांचा कालावधी लागला, वरीष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळेच मी ही कामगिरी पार पाडू शकलो, अशी प्रतिक्रिया शिवाजी ननवरे यांनी दिली.