नागपूर: शहरातील अनेक दहनघाटांचे प्रवेश द्वार तुटले आहे. त्यामुळे परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असतो, अशा अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच दहनघाटावर मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपाच्या अधिकृत दहनघाटांवर आवश्यक त्या सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा सूचना आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिल्या.
यावेळी दहनघाटांचे देखभाल दुरुस्ती आणि सौंदर्यीकऱणही करण्यात यावे. याचा पाठपुरावा विभागाने करावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. सोमवारी (ता. 5 जून) मनपा मुख्यालयात वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या आढावा बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने उपसभापती प्रमोद कौरती, सदस्य लखन येरवार, विजय चुटेले, भावना लोणारे, आशा उईके, वंदना चांदेकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, मलेरिया-फायलेरिया विभागाच्या जयश्री धोटे, वैद्यकीय अधिकारी (एम) डॉ. विजय जोशी, डॉ. बहिरकर यांची उपस्थिती होती.
मान्सूनचे आगमन विदर्भात झाले असल्याने शहरात केव्हाही पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शहरातील ज्या नदीनाल्यांचे स्वच्छता कार्य बाकी आहे ते कार्य तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना यावेळी आरोग्य समिती सभापतींनी केल्या. बैठकीत भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील मार्गाची दुरुस्ती करण्याच्या सूचना मागील बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्या कार्याचा आढावा घेत येत्या 7 दिवसांत काम पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. शहरातील प्रत्येक नागरिकाला आऱोग्य सेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने मनपाचे बंद रुग्णालय सुरु करावे, तसेच रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यास यावर कंत्राटी पद्धतीने भरती करण्याबाबत विभागाने अहवाल सादर करावा, अशा सूचनाही यावेळी सभापतींनी दिल्या. बैठकीत पावसाळी आजारांपासून नागरिकांचे रक्षण कऱण्याच्या उद्देशाने नियमित फवारणी व्हावी, तसेच स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी केल्या.