नागपूर: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. हे पाहता समृद्धी महामार्गावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी ही याचिका दाखल केली आहे.
राज्य सरकार व इतर संबंधित प्रतिवादींना न्यायालयाने बुधवारी नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी पार पडली.
समृद्धी महामार्ग डिसेंबर-२०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग सुरु झाल्यापासून यावर अनेक मोठे अपघात झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु, महामंडळाने याबाबत काहीच हालचाली सुरु केल्या नाही. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.अपघाताला आळा बसावा यासाठी न्यायालयानेच आवश्यक आदेश जारी करावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.