Published On : Mon, Nov 27th, 2017

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वितरणाबाबतची माहिती द्या – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement


नागपूर: पेंच सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाणी देण्यासंदर्भात पाणी वाटपाचे नियोजन करुन तीन दिवसाच्या आत पाणी वितरणा संबंधीची संपूर्ण माहिती पाणी वापर संस्थांसोबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलेत.

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी करण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता बी.एस. स्वामी, अधीक्षक अभियंता ललित इंगळे, कार्यकारी अभियंता श्री. तुरखेडे, एस.जी. ढवळे, आदी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

पेंच नदीवर मध्यप्रदेश शासनाने चौराई प्रकल्पाचे बांधकाम झाल्यामुळे तसेच अपुऱ्या पावसामुळे पेंच प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्यासोबतच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी एक पाळी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरीप हंगामासाठी 21 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करताना लाभक्षेत्रातील शेतकऱ्याला याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच पीक पध्दतीबाबतही कृषी विभागातर्फे संपूर्ण माहिती पोहचवावी अशा सूचना यावेळी दिल्यात.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना पालकमंत्री म्हणाले की, रब्बी व खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार असून उपलब्ध पाण्यात घ्यावयाच्या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. पेंच प्रकल्पातील आरक्षणानुसार पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणानुसार नागपूर शहरासाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करुन त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने वॉटर ऑडीट करण्यासंदर्भात सूचना देण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. शहरासाठी आवश्यक असणारे पाणी तसेच भूगर्भातील उपलब्ध पाणी याचा समन्वय ठेवून मॉल, उद्योग, आदींना पिण्याचे पाण्याचा वापर बंद करुन तसेच अपव्यय टाळून पाण्याची बचत कशी करता येईल या संदर्भातील अहवाल एक महिन्यात सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात.

पेंच प्रकल्पातील कोराडी व खापरखेडा येथील पाण्याचे आरक्षणाऐवजी त्यांना भांडेवाडी प्रकल्पातून पुनर्वापर केलेले पाण्याचा वापर करावा, मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी पुनर्वापर केलेलेच पाणी वापरावे याबाबत धोरण ठरविण्यात आले असून पिण्याचे पाणी केवळ पिण्याच्या वापरासाठी व्हावे. त्यानुसार संबंधीत संस्थांनी तात्काळ कार्यवाही करवी, असे सांगतांना पालकमंत्री म्हणाले की, पेंच प्रकल्पाच्या जलसाठ्यात निर्माण झालेली तुट भरुन काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मध्यप्रदेशातील लेहघोगरी येथून टनेलद्वारे पाणी आणण्याचे नियोजन आहे. तसेच कन्हान नदीवर तीन बंधारे, तसेच नाग नदीवर बंधारा बांधून हे पाणी कालव्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 200 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून हा प्रकल्प नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत घेण्यासंदर्भात नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

पेंच प्रकल्पाअंतर्गतच्या लाभक्षेत्रामध्ये खरीप हंगामासाठी काही भागात पाणी न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात नुकसान भरपाई तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आमदार सुनील केदार व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी मागणी केली. तसेच पाणी उपलब्ध करुन देतानाच पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांना याबाबत पूर्व कल्पना द्यावी. त्यानुसार पिकांचे नियोजन करणे सूलभ होईल आदी सूचना यावेळी करण्यात आल्यात.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एक पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यानुसार पिकांचे नियोजन करावे, त्यासोबतच पाण्याची उचल करण्यासाठी भारनियमनासंदर्भात सिंचन विभागातर्फे प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना यावेळी केली.

Advertisement
Advertisement