नागपूर: लकडगंज झोनअंतर्गत दररोज अर्धा तासऐवजी एक तास पाणी पुरवठा करा, आवश्यक त्या भागात एक दिवसाआड टँकर पाठवा आणि दूषित पाण्याच्या तक्रारींचा निपटारा त्याच दिवशी करा, असे निर्देश जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका सभागृहात झालेल्या निर्णयानुसार नगरसेवकांच्या पाणीविषयक तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यावर चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी जलप्रदाय समितीच्या वतीने झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत गुरुवारी (ता. ३) लकडगंज झोनची बैठक झोन कार्यालयात पार पडली. बैठकीला सभापती पिंटू झलके यांच्यासह उपनेते बाल्या बोरकर, झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रदीप पोहाणे, अनिल गेंदरे, राजकुमार साहू, मनिषा अतकरे, मनिषा धावडे, जयश्री रारोकर, वैशाली रोहणकर, सरीता कावरे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, ओसीडब्ल्यूचे अधिकारी सर्वश्री कारला, घरझाडे, सिंग उपस्थित होते.
सदर बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी पाणी केवळ अर्धा तास येत असल्याची समस्या मांडली. अनेक भागात त्यापेक्षाही कमी वेळ पाणीपुरवठा होतो. मिनी माता नगर, डिप्टी सिग्नल या भागात दूषित पाणी पुरवठा होतो. दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी १५-१५ दिवस सुटत नाही, दुरुस्तीसाठी केलेले खड्डे वेळेच्या आता बुजविले जात नाही, टँकरची उपलब्धता होत नाही अशा अनेक तक्रारी समितीपुढे मांडल्या. यावर ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे देत सर्व समस्यांचे निराकरण तातडीने करू, असे आश्वस्त केले.
सभापती पिंटू झलके यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. ज्या भागात दोन-दोन दिवसाआड टँकर पाठविला जातो तेथे आता एक दिवसाआड टँकर पाठवा. दूषित पाण्याची समस्या एका दिवसात सोडवा, असे निर्देश दिले.
दुरुस्तीकामासाठी जेथे खड्डे खोदण्यात आले आहेत, ते खड्डे ४५ दिवसांच्या आत भरणे आणि तेथे सीमेंटीकरण करणे आवश्यक आहे. ४५ दिवसांच्या आत जे खड्डे भरण्यात आले नाही तेथे प्रति दिवस दंड आकारण्याचे निर्देशही पिंटू झलके यांनी दिले.