ज्ञानदीप व काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशनचा पुढाकार : महापौरांकडे केली किल्ली सुपूर्द
नागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मनपा सदैव तत्पर आहे. मनपाच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शहरातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मनपाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी प्रदान करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप संस्था आणि काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशनतर्फे मनपाला व्हेंटिलेटर व रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी (२७ ऑक्टोबर) महापौर कक्षामध्ये ज्ञानदीप संस्थेकडून व्हेंटिलेटर व काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएनच्या वतीने दोन रुग्णवाहिका मनपाच्या आरोग्य सेवेसाठी देण्यात आले आहेत. काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएनचे अध्यक्ष श्री. प्रवीण महाजन यांनी व्हेंटिलेटर तसेच श्री. महाजन आणि असोसिएशनचे सचिव श्री. बी.केसी.नायर यांनी ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा असलेली रुग्णवाहिकेची किल्ली महापौर श्री.संदीप जोशी यांना सुपूर्द केली.
याप्रसंगी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, नगरसेवक श्री. भगवान मेंढे, असोसिएशनचे डॉ. हितेंद्र चांदेवार, मोरेश्वर ढोबले, नरेश मॉरिस आदी उपस्थित होते.
महापौर श्री. संदीप जोशी यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचा गौरव केला आणि मनपा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर तसेच रुग्णवाहिका दिल्याबददल आभार मानले. दोन्ही संस्थांच्या पुढाकाराने मिळालेल्या व्हेंटिलेटर अणि रुग्णवाहिकांचा रुग्णांच्या सेवेकरिता निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही महापौर श्री.संदीप जोशी यांनी व्यक्त केला. श्री. प्रवीण महाजन यांनी सांगितले की, ज्ञानदीप संस्थाकडून आतापर्यंत रुग्णांसाठी १० व्हेंटिलेटर, मेळघाट, हेमलकसा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), मातृसेवा संघ, दंदे फाऊंडेशन, विवेकानंद रुग्णालयांना प्रदान करण्यात आले आहे.