नागपूर: पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महापौर नंदा जिचकार यांनी प्रभाग क्र. ३७ मधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. विशेष म्हणजे कार्यक्रमात येण्यास असमर्थ असलेल्या काही ज्येष्ठ व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला.
महापौर नंदा जिचकार यांनी स्वतः या ‘गौरव सोहळ्याचे आयोजन बुटी ले-आऊट येथील सिद्ध गणेश मंदिरात केले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी उपमहापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लोखंडे, प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शुक्ला उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीड़ा समिती उपसभापती प्रमोद तभाने, गिरीश देशमुख, विमल श्रीवास्तव, गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष नानासाहेब चिंचोळकर, सुनील अलोनी उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार व प्रमुख अतिथींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ आणि अटलबिहारी बाजपेयी यांच्याशी संबंधित पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्यानी आपल्या भाषणातून ज्येष्ठाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आजच्या पिढीवर टाकलेल्या संस्कारबद्दल आभार मानले. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आम्हाला जगण्याची आणि परोपकाराची दिशा दाखविणारे असते. त्यांचा आदर सत्कार म्हणजे त्यांनी आमच्यावर केलेल्या उपकाराचे ऋण फेडण्यासारखे आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी ज्येष्ठाचा गौरव केला.
कार्यक्रमात येऊ न शकलेल्या ज्येष्ठाचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.३७ चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.