नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिल्हास्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद पटकाविण्याचा मान वाडी येथील पीटीएमएस संघाने प्राप्त केला. १४ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रतिस्पर्धी महाराष्ट्र क्रीडा मंडळ संघाला नमवून वाडी संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात ही स्पर्धा पार पडली.
१४ वर्षाखालील वयोगटात मुले व मुलींची अंतिम लढत पीटीएमएस वाडी विरुद्ध महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्यात झाली. यात पीटीएमएस संघाने विजेतेपद प्राप्त केले. मुलांच्या गटात प्रबोधनकार ठाकरे संघ आणि मुलींच्या गटात साउथ पॉईंट स्कूल तिसऱ्या स्थानी राहिले. मुलांमध्ये वीर दुर्वे ‘बेस्ट अटॅक्टर’, सम्यक वैरागडे ‘बेस्ट डिफेन्डर’ आणि पीयूष पटले ‘बेस्ट प्लेअर’ ठरला. मुलींमध्ये प्रेरणा काळे ‘बेस्ट अटॅक्टर’, जानवी जाधव ‘बेस्ट डिफेन्डर’ आणि वाय. ठाकरे ‘बेस्ट प्लेअर’ ठरली.
पुरुष गटात महाराष्ट्र क्रीडा मंडळ-ए संघाने आणि महिला गटात स्वराज संघाने विजेतेपदावर मोहोर उमटविली. पुरुष गटात पीडब्ल्यूएस स्पोर्ट्स ॲकेडमीला नमवून महाराष्ट्र क्रीडा मंडळ संघाने बाजी मारली. डीएनसी क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत आर्यन चौधरी ‘बेस्ट अटॅक्टर’, चेतन दोनाडकर ‘बेस्ट डिफेन्डर’ आणि भूषण गोमासे ‘बेस्ट प्लेअर’ ठरला. महिला गटात स्वराज संघाकडून पराभव स्वीकारुन पीडब्ल्यूएस कॉलेज संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र क्रीडा मंडळ तिसऱ्या स्थानी राहिले. स्पर्धेत तनुश्री तेलंग ‘बेस्ट अटॅक्टर’, दुर्गा सहारे ‘बेस्ट डिफेन्डर’ आणि श्रुती वंजारी ‘बेस्ट प्लेअर’ ठरली.
स्पर्धेतील विजेत्यांना भारतीय आट्या-पाट्या महासंघाचे सचिव डॉ. दीपक कविश्वर, डॉ. संजय चौधरी, माजी राष्ट्रीय खेळाडू सुधीर चिटणीस, शशी जोशी, महोत्सवाचे सहसंयोजक डॉ. पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.