नागपूर: भारतीय रेल्वे ही देशाची केवळ जीवनवाहिनीच नाही तर राष्ट्राच्या प्रगतीचा कणा आहे. दररोज लाखो प्रवासी, त्यात विशेषतः महिला, रेल्वेच्या माध्यमातून देशभर प्रवास करतात.
रेल्वे सुरक्षा बल (RPF) हे भारतीय रेल्वेचे शस्त्रबळ असून, रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी पार पाडत असते. प्रत्येक महिला प्रवाशीसाठी सुरक्षित, निर्भय आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी RPF कटिबद्ध आहे.
मा. दीपचंद्र आर्य, मंडळ सुरक्षा आयुक्त, RPF दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सातत्याने मोहीम राबवली जात आहे. “मेरी सहेली”, “अक्षिता” यांसारख्या सुविधा एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, अजूनही महिलांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना केवळ माहितीच्या अभावामुळे करावा लागतो.
त्या अनुषंगाने, नागपूर मंडळात 18 एप्रिल 2025 ते 24 एप्रिल 2025 या कालावधीत महिला सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत प्रमुख स्थानकांवर नुक्कड नाटकांचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यप्रस्तुतीद्वारे महिला प्रवाशांवरील गुन्हे, त्रासदायक बाबी आणि त्यावरील उपाय, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया व त्वरित कार्यवाही कशी घडवून आणावी याची माहिती दिली जात आहे.
तसेच, महिला सुरक्षेशी संबंधित माहितीपत्रके वाटण्यात येत असून, स्टिकर्स लावण्याबरोबरच वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मिडियाच्या माध्यमातूनही प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.