Published On : Thu, Jan 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

राज्यपालांच्या हस्ते संस्कृती जागरण मंडळाच्या सांस्कृतिक विशेषांकाचे प्रकाशन

Advertisement

‘स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासोबत वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

देशातील वनवासी, जनजाती व आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जसे मोठे आहे, तसेच धर्मांतर करणाऱ्या शक्तींचा विरोध करून संस्कृती रक्षणाचे त्यांचे कार्य देखील महत्वाचे आहे. वनवासी बांधवांच्या शीघ्रतम विकासासाठी कार्य करताना त्यांचे संस्कृती रक्षणाचे कार्य देखील समाजापुढे आणले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver / Kg - 93,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संस्कृती जागरण मंडळ व जनजाती विकास मंचतर्फे ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २६) राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला जनजाती विकास मंचचे अध्यक्ष नरेश मराड, सांस्कृतिक वार्तापत्राचे सचिव शिरीष पदे, वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर, रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे, अजय मुडपे व इतर निमंत्रित उपस्थित होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक क्षेत्रात महिलांची प्रगती होऊन त्या पुढे आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांची देखील प्रगती झाली. मात्र वनवासी बांधव विकासापासून अजूनही दूर आहेत. आजही अनेक आदिवासी भागांमध्ये रस्ते, दूरसंचार, वीज आदी सेवा पोहोचल्या नसून वनवासी बांधवांच्या विकासासाठी शीघ्रगतीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

माओवादी, डाव्या विचार सरणीचे लोक तसेच पर्यावरणवाद्यांनी आडमुठी भूमिका घेऊन आदिवासी विभागांच्या विकासात एकप्रकारे अडथळे निर्माण केले असे सांगून आदिवासींच्या विकासासाठी शासनासह सेवाभावी संस्थांनी देखील अधिक प्रयत्न केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील विशेषांक प्रसिद्ध करून संस्कृती जागरण मंडळाने राज्यातील तसेच देशातील अनेक ज्ञात व अज्ञात वनवासी बांधवांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची अभ्यासपूर्ण माहिती समोर आणल्याबद्दल राज्यपालांनी व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

मुकुंद कानडे यांनी यावेळी विशेषांकाची माहिती दिली तर नरेश मराड यांनी जनजाती विकास मंचची माहिती दिली. सांस्कृतिक वार्तापत्राचे कार्यवाह शिरीष पदे यांनी आभार प्रदर्शन केले.

Advertisement
Advertisement