मुंबई : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंड पुकारले होते. मात्र पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ आले असताच, त्यांचे हे बंड थंड करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना यश आले असून आबा बागुल यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान काँग्रेस पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बाहेरून आलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात बागुल यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे मेणबत्ती लावून प्रतिकात्मक आंदोलन केले होते.
यावेळी बागुल यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेची हत्या झाली आहे, असे शब्द लिहिलेला शर्टही घातला होता. तसेच काँग्रेस पक्षात सातत्याने निष्ठावंत कार्यकर्ते-नेत्यांवर अन्याय करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत आयाराम-गयाराम लोकांना संधी दिली जात आहे.
यामुळे पक्षाशी निष्ठावंत राहिलेला कार्यकर्ता भरडला जात आहे. याची दखल पक्षाच्या हायकमांडने घ्यावी अशी मागणी देखील बागुल यांनी केली होती.