पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वॉर्ड क्रमांक 22 क च्या पोटनिवडणुकीत, राष्ट्रवादीनेच बाजी मारली.
प्रभाग क्रमांक 22 (क) मुंढवा येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे तब्बल 3521 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या मोनिका तुपे यांचा पराभव केला. तर सत्ताधारी भाजपच्या सुकन्या गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
पूजा कोद्रे यांना 8991 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 5470 मतं, भाजपच्या सुकन्या गायकवाड 4334 मतं मिळाली.
पूजा कोद्रे या चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत. चंचला कोद्रे यांचं डिसेंबर 2017 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं.
त्यामुळे इथे पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीसाठी काल 35 टक्के मतदान झालं.
मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागात 29 हजार 278 पुरुष आणि 26 हजार 436 महिला, असे एकूण 55 हजार 714 मतदार आहेत.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले होते, पण ते अयशस्वी झाले होते.