नागपूर : पुणे पोलिसांच्या पथकाने आज सकाळच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. पुणे येथे झालेल्या कोरेगाव-भीमा एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोवंडीमधून अटक केली आहे. त्याच बरोबर नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग आणि दिल्ली येथून रॉना विल्सन या नक्षलवाद्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका शोमा सेन यांची सध्या चौकशी सुरू असून घराची झडती घेतली जात आहे.
१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ही कारवाई झाल्याचे बोलले जाते. पुणे पोलिसांच्या चार पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या थिंक टँकला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे.
दोन महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी छापे घातले होते. यात नागपुरमधील वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली होती. तर, पोलिसांनी सुधीर ढवळे त्यांच्या सहकारी हर्षाली पोतदार यांच्या निवासस्थानाची झडती घेतली होती. याशिवाय पुण्यातील कबीर कला मंचच्या ज्योती जगताप, रमेश गायचोर, ढवळा ढेंगळे, सागर गोरखे यांच्या घराची झडती घेतली होती. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन रोना विल्सनला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठात प्राध्यापिका असलेल्या शोमा सेन या अटकेत असलेला नक्षलवादी साईबाबा याच्या निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. शोमा यांच्या पतीला याआधी गुजरात पोलिसांनी अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.