पिंपरी–चिंचवड: 3 एप्रिल रोजी महाराष्ट्रात दोन घटना घडल्या ज्यांनी खळबळ उडाली. महाराष्ट्रातील तरूणाई सुरक्षित नसलेल्या दोन घटना एकाच दिवशी पिंपरी – चिंचवड आणि लोणावळ्यात घडली. वाकड येथे एका आमदाराच्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर झालेला प्राणघातक हल्ला झाला आणि लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांड दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या. मात्र याचा तपास वेगवेगळ्या पद्धतीने लागत असल्याचं दिसत आहे.
मात्र, दुहेरी हत्याकांडापेक्षा विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी तसेच नेत्यांनी अधिक गांभीर्य दाखवल्याचे दिसते. पिंपरी चिचवडमध्ये विद्यार्थिनींवर एका तरुणाने केलेल्या हल्ल्यात मुलीच्या डाव्या हाताची करंगळी कापली गेली. पीडित मुलगी आणि प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी हे एकाच बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली होती. या हल्ल्यात अश्विनी बोदकुरवार जखमी झाली होती.
यवतमाळ येथील वणीचे भाजपचे आमदार संजीव बोदकुरवार यांची ती मुलगी असल्याचं घटनेदरम्यान समोर आलं होत. राजेश बक्षी (वय २३) असे हल्ला करण्याऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा हरियाणाचा होता. पोलिसांनी या घटनेनंतर काही क्षणातच त्याला ताब्यात घेतले. ३ एप्रिल सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान घडली. घटनेतील तरुणी आमदारांची मुलगी असल्याचे समजताच पिंपरी चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली. आणि प्रकरणाचा छडा लावला. मात्र दुहेरी हत्याकांडाबाबत पोलिस संथगतीने काम करत असल्याचं स्पष्ट होतंय.
लोकसत्ताच्या अहवालानुसार, पिंपरी चिंचवड परिसर आणि महाराष्ट्राच्या इतर भागात आमदाराच्या मुलीवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले. अश्विनी बोदकुरवार हिला ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या खासगी रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. त्याच दिवशी या हल्ल्याचा निषेध आणि माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार महेश लांडगे आणि पिंपरी चिंचवडमधील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. केवळ आणि केवळ आमदाराच्या मुलीवर हल्ला झाला म्हणून वेळात वेळ काढून महिला आयोगाच्या अध्यक्षा या मुंबईवरून पिंपरी चिंचवड येथे आल्या.
विशेष म्हणजे त्याच दिवशी लोणावळ्यातील भुशी धरणावरील डोंगरात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांचे मृतदेह आढळले. मात्र, त्याच रस्त्यावरुन येणाऱ्या विजया रहाटकर यांनी याची दखल सुद्धा घेतली नाही. घटनेनंतर सार्थकच्या मित्रांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह विभागाला या दुहेरी हत्येप्रकरणी मेन्शन करून ट्विट केले. मात्र, अद्यापही या ट्विटला उत्तर मिळालेले नाही.
म्हणजे एकीकडे आमदाराच्या मुलीवर हल्ला झाला तर निषेध नोंदवण्यासाठी मंत्री हे पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले जातात तर दुसरीकडे एक महिना उलटला तरी देखील दुहेरी हत्येप्रकरणी आरोपी मात्र मोकाटच फिरत आहेत. हा कसला अजब न्याय म्हणायचा, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतो आहे. दरम्यान, न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करेन, असा इशारा सार्थकच्या आईने दिला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होत आहे.