नागपूर: नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करताना सर्वांनाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आव्हाने ही आपणाला कार्य पणाला नेण्याची प्रेरणा देतात. आव्हानांविना कोणतेही कार्य निरस असते. रोजच्या आपल्या कामामध्ये काही बदल वाटावा, काम करताना ऊर्जा निर्माण व्हावी व नव्या चैतन्याने काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी वनामतीच्या सहकार्याने मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर कर्तव्यावर रूजू होताना आपल्या कामामध्ये प्रशिक्षणात सांगितल्या बाबी प्रतिबिंबित झाल्यास प्रशिक्षणाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी केले.
वनामती येथे आयोजित मनपाच्या तांत्रिक (टेक्निकल) व अतांत्रिक (नॉन टेक्निकल) कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शनिवारी (ता. १३) समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे बोलत होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, वनामतीचे कुलसचिव मुकुंद देशपांडे, वनामतीचे प्रशिक्षण समन्वयक विश्वास पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय वनामती येथे शनिवार (ता. १३)पासून सहायक आयुक्त व विभाग प्रमुख यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
समारोपीय कार्यक्रमात बोलताना आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे म्हणाले, प्रशिक्षणानंतर नव्या उमेदिने सर्वांनी कामाला लागून आपल्या समाजासाठीचे जे चांगले करता येईल, ते करण्याचा पूरेपूर प्रयत्न करावा. कार्यालयात काम करत असताना कर्मचारी नेहमी तणावात असतात. एक ‘रोबोट’ सारखेच प्रत्येक जण कामात गुंतले असतात. अशात आपणाला एक व्यक्ती म्हणून आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा मिळावी, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. त्यामध्ये यश आल्यास आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची फलनिष्पत्ती झाली असे म्हणता येईल, असेही आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले.
आज आपले शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून उदयास येत आहे. कोणत्याही शहराच्या विकासात तेथील नागरिकांप्रमाणेच मनपातील मोठ्या अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. अशात आपल्याकडे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या ज्ञानात अधिक भर घालून आपणही ‘स्मार्ट वर्क’ करावे, असेही आयुक्त श्री. ठाकरे म्हणाले.
पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये मनपाच्या अतांत्रिक (नॉन टेक्निकल) कर्मचाऱ्यांचे उद्बोधन वर्गाद्वारे उजळणीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच तांत्रिक (टेक्निकल) कर्मचाऱ्यांसह त्यांना तांत्रिक ज्ञानासह इतर बाबतींचे ज्ञान देण्यात आले. माहितीचा अधिकार, तणावाचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन, ध्येय निश्चिती, विशाखा कायदा, सादरीकरण, संवाद शैली, व्यक्तीमत्व विकास, भावनिक, बुद्धिमत्ता विकास, नागरी सेवा नियम आदींची विस्तृत माहिती विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शनाद्वारे प्रशिक्षणार्थींना दिली. सहायक आयुक्त, स्थापत्य अभियंता सहायक, कनिष्ठ अभियंता सहायक व इतर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचेही प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक व इतर शैलींबाबत दोन दिवसीय प्रशिक्षणात उद्बोधन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात ५२ तांत्रिक (टेक्निकल) कर्मचारी, ४९ अतांत्रिक (नॉन टेक्निकल) कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तर सहायक आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये ४५ अधिकारी असे एकूण मनपाच्या १४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
समारोपीय कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख म्हणाले, आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेमध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे व लोकांमध्ये आपल्याबद्दल चांगली छबी निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आपल्या कामामुळेच आपली प्रतिमा निर्माण होते, त्यामुळे कामाशी प्रामाणिक राहिल्यास त्याचे फळ नक्कीच भविष्यात मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, कार्यालयासह कुटूंबासोबतही तेवढ्याच आनंदात व तणावरहीत राहता यावे यासाठी असे प्रशिक्षण महत्वाचे ठरतात. भविष्यात असे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यास मनपा प्रयत्नरत राहिल, असेही अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख म्हणाले.
समारोपीय कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करून सूचनाही मांडल्या. मनपा आयुक्त व वनामतीचे संचालय रवींद्र ठाकरे यांच्यासह वनामतीचे अपर संचालक सुधीर ननवरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुवर्णा पांडे यांच्या मार्गदर्शनात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. प्रकाश शेष, डॉ. सुधीर भावे, श्री. जेठवा, प्रशांत चौधरी, अनिरुद्ध पाटील आदींनी विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.