नागपूर : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशा अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखीत वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली आहे. मात्र, प्राप्त परिस्थिती व परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही. आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची मोठी ज्ञान संपदा आहे. त्याचे संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करू असेही त्यांनी सांगितले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्य साधारण महत्व आहे. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.
विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.