Published On : Sat, Jun 2nd, 2018

शेतक-यांच्या आंदोलनाला पब्लिसीटी स्टंट म्हणणा-या राधामोहन सिंह यांनी शेतक-यांची माफी मागावीः अशोक चव्हाण

Ashok Chavan
मुंबई: भाजपच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उध्दवस्त झालेले शेतकरी देशभर आंदोलन करित आहेत या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट संबोधून देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतक-यांचा अवमान केला आहे. त्यांनी देशातील शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, कृषीमंत्र्यांचे वक्तव्य दुर्देवी असून भाजप नेत्यांची शेतक-यांबाबतची हीन मानसिकता दर्शवणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शेतक-यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्दवस्त झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये 41.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात देशात 44 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत एकट्या महाराष्ट्रात 15 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात दररोज 35 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करित आहेत. युपीए सरकारच्या काळात 4.2 टक्के असणारा कृषी विकासदर आता 1.9 टक्क्यांवर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतक-यांच्या मालाला उत्पादन खर्चावर दीडपट अधिक हमीभाव देण्याची आश्वासन दिले होते. तसेच 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र गेल्या चार वर्षात शेतीमालाला हमीभावही मिळत नाही. मोदींनी देशातील उद्योगपतींचे जवळपास अडीच लाख कोटींचे कर्ज माफ केले पण संकटात असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी मात्र दिली नाही. राज्यातल्या भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केली त्याला एक वर्ष झाले पण अद्यापही शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांचा विश्वासघात केला आहे आणि आता त्यांचे मंत्री बेताल वक्तव्ये करून संकटात असलेल्या शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. आगामी काळात देशातील शेतकरी या मस्तवाल सरकारची मस्ती उतरवतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement