मुंबई : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राहुल आवारे यांना आज येथे गौरविले.
यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन आदी उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियामध्ये गोल्डकोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारे यांनी ५७ किलो वजनी गटात फ्रि-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मल्ल राहुल यांचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांत पदक पटकाविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापूर्वीच आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता राहुल यांनी २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीला लागावे आणि ऑलिंपिकचे मैदानही जिंकावे. या स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल.
यावेळी मल्ल राहुल यांनीही कुस्तीमध्ये यापुढेही चमकदार कामगिरी व्हावी यासाठी मेहनत घेईन, एवढ्यावरच थांबणार नाही, असे आश्वस्त केले.
यावेळी राहुल यांचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार, दिलीप भरणे, दत्ता गायकवाड, गोविंद पवार आदी उपस्थित होते.