नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येत आहेत. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची आज भेट घेत, सूर्यवंशी यांच्या कुंटुबियांचे सांत्वन केले.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबरोबर झालेला प्रकार गंभीर आहे. सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी संपूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभं असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. आता राहुल गांधी उद्या परभणीत येत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहे.
परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचे दिसून आले. या घटनेत काहींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज परभणी दौरा करणार आहेत. आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे देखील परभणी दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आता परभणीचा मुद्दा आणखी तापणार असल्याच्या चर्चा आहेत.