नवी दिल्ली :संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. जीएसटी, नोटबंदी, अग्नीवीर योजना, शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्दे त्यांनी सभागृहात उचलून धरले आहे.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचं सभागृहात काल पहिल्यांदाच भाषण होतं. यावेळी लोकसभेत राहुल गांधींनी आक्रमक होत हिंदुत्वाच्या मुद्यांवरून भाजपवर निशाणा साधला. याला समर्थन देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
मोदी सरकारच्या नेत्यांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण माघावं लागलं, एकटे राहुल गांधी हे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह ९ मंत्र्यांना भारी पडले, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. भाजप उद्धव ठाकरेंना टार्गेट करून त्यांनी सोडल्याची टीका करतात. तेव्हा उद्धव ठाकरे ज्या प्रकारे उत्तर देतात, त्याच प्रकारे काल राहुल गांधी यांनी उत्तर दिले. उद्धव ठाकरे सांगतात आम्ही भाजपाला सोडले, हिंदुत्वाला सोडलेले नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही.
राहुल गांधींनी सभागृहात सांगितले की, हिंदुत्वाचा ठेका हा मोदींनी घेतलेला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाचा विचार हा खूप मोठा आहे. ते भाजपाला समजलेले नसल्याचे राऊत म्हणाले.