शिमला: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले. गीतेच्या श्लोकाचा संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. मोदींनी स्वत:साठी गीतेच्या श्लोकात थोडा बदल केला आहे, असे यावेळी राहुल गांधींनी म्हटले.
‘काम करत रहा. फळाची अपेक्षा करु नका, अशा अर्थाचा एक श्लोक गीतेमध्ये आहे. मात्र मोदींनी स्वत:साठी गीतेच्या श्लोकात बदल केला आहे. ‘इतरांच्या कष्टाची फळं खात रहा. कोणतेही काम करु नका,’ असा बदल मोदींनी श्लोकात केला आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना टोला लगावला. पुढील महिन्यात हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी मोदी आणि राहुल गांधींचा जोरदार प्रचार सुरु असून जाहीर सभांमधून हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहे.
याआधी काँग्रेस उपाध्यक्षांनी वस्तू आणि सेवा करावर टीका करताना या कराचा उल्लेख ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा केला होता. ‘जीएसटी’ आणि ‘नोटाबंदी’ ही भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोदींनी डागलेली दोन विनाशकारी अस्त्रे असल्याचे टीकास्त्रही राहुल गांधींनी सोडले होते. यानंतर रविवारी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ‘काँग्रेसने मैदानातून पळ काढल्याने हिमाचल प्रदेशातील निवडणूक एकतर्फी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मजा राहिलेली नाही,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर शरसंधान साधले होते.
मोदींच्या या टीकेला राहुल गांधींनीही लगेच प्रत्युत्तर दिले. ‘महागाई आटोक्यात ठेऊ शकत नसाल, बेरोजगाराची समस्या सोडवू शकत नसाल, तर खुर्ची सोडा,’ असे म्हणत राहुल गांधीनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ही टीका केली.