पुणे : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली.
दलित असल्याने पोलिसांनी सोमनाथची हत्या केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले, असे राहुल गांधी म्हणाले. या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,राहुल गांधी याठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय त्यांचे आहे.
तेच काम गेली अनेक वर्ष ते सातत्याने करताहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की, हे जे काही विद्वेषाचे त्यांचं जे काम आहे, त्याठिकाणी जाऊन पूर्ण केले आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर केली.