Published On : Wed, Feb 28th, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राहुल गांधींचे स्टिकर्स; सर्वांच्या भुवया उंचावल्या !

Advertisement

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर असून त्यांची भारी येथे सभा होणार आहे. महिला बचत गटासंदर्भात ही सभा असून दोन लाखांहून अधिक महिला याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हे पाहता सभास्थळी सर्वात मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे.

मात्र याठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र यामागील खरे कारण म्हणजे या सभांसाठी नागपुरात राहुल गांधी यांच्या सभेसाठी वापरलेल्या खुर्च्या आल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांचा फोटो असून स्कँन टू डोनेट असे या स्टिकर्सवर लिहिले आहे.

Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेऊन या सभेचे आयोजन केले आहे.४७ एकर परिसरात सभामंडप तयार करण्यात आला आहे. सभास्थळी ९ लाख १० हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडप लावण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी सुमारे दोन लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील काही खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर्स आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान नागपुरात काँग्रेसची सभा पार पडली. त्या सभेतिला राहुल गांधींचे स्टिकर्स लावलेल्या खुर्च्या मोदींच्या आजच्या सभेसाठी कंत्राटदाराने आणल्या आहेत. या खुर्च्या आणताना राहुल गांधी याचे स्टिकर्स काढले नाही. परंतु खुर्च्याच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा प्रचार होत आहे. मोदी यांची दुपारी चार वाजता सभा होणार आहे. तत्पूर्वी खुर्च्यांवरील राहुल गांधींचे स्टिकर्स काढले जाणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.