नागपूर : गांधीसागर तलावाजवळ एका सलून आणि मेकअप स्टुडिओच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. वेश्याव्यसाय करणाऱ्या चार जणी या छाप्यात पोलिसांच्या हाती लागल्या. हा कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. अंजली शहा आणि लोकेश रोहिणीप्रसाद मिश्रा (वय ३३, रा. वेदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गांधीसागर तलावाजवळ अंजली आणि लोकेशने काही दिवसांपूर्वी बार्बी सलून अॅन्ड ब्राईडल मेकअप स्टुडियो सुरू केला होता. तेथे हे दोघे चक्क कुंटणखाना चालवित होते. त्याची माहिती कळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस निरीक्षक मीना जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाईसाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तेथे शनिवारी रात्री पोलिसांनी ग्राहक पाठविले.
अंजलीने त्याला दोन हजारांची मागणी करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार तरुणी दाखवल्या. ग्राहकाने एका तरुणीला आतल्या रूममध्ये नेल्यानंतर पोलिसांना विशिष्ट प्रकारे इशारा दिला. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा मारला. यावेळी चार तरुणींसह हा कुंटणखाना चालविणारे अंजली आणि लोकेश पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी सुरू आहे. जेथे हा कुंटणखाना चालत होता, ते स्थळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, हे विशेष!