नागपूर रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळलेल्या एका व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मृताची अद्याप ओळख पटली नाही. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील तापमाण वाढत आहे. शुक्रवारी नागपूरचे तापमाण ४६.३ अंश नोंद करण्यात आली होती. शनिवारी ४६ अंशावर पारा होता. रविवारी पारा आणखी चढला. ४६.५ अंश ऐवढी नोंद करण्यात आली. सोमवारी पारा चढत ४६.७ अंशावर पोहचला. तर मंगळवारीही तापमान कायम होते. वाढत्या उन्हामुळे कुलरही काम करीत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणेच कठिन झाले आहे. अशातच रस्त्यावरील बेघर आणि निराधारांना जीव वाचविण्यासाठी आडोसा घ्यावा लागत आहे. मात्र, उष्णवाºयामुळे जगणेच कठिन झाले आहे. अशाच स्थितीत रेल्वे स्थानकावरील एकाचा मृत्यू झाला. नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमे कडील मुख्य पोर्चमध्ये सायंकाळी ५ वाजता तो बेशुध्दावस्थेत आढळला. लोहमार्ग पोलिस जयकांत गायकवाड यांनी लगेच त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतक ५५ ते ६० वयोगटातील आहे. मजबुत बांधा असून उंची ५.७ एवढी आहे. अंगात काळ्या रंगाचा पॅन्ट आणि पांढºया रंगाचा शर्टावर हिरव्या लायनिंग आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास एएसआय विजय मरापे करीत आहेत.