नागपूर : शहरात नवतपा सुरु झाल्यानंतर नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. यातच काल नागपुरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत पुन्हा हवामानात बदल होऊ शकतो.
हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान विदर्भात पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर यावेळी उकाडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. याआधीच रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.