नागपूर : शहरातील पावसाळी नाल्या बुजल्या असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते. या पाण्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होऊ शकेल का, याचा विचार व्हावा. ते शक्य असेल तर प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वी त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
यासंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेश भूतकर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, धनराज मेंढुलकर, अनिल गेडाम, श्री. गुरुबक्सानी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पावसाळी नाल्या अनेक ठिकाणी जोडल्या नसल्याची बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. या नाल्या जोडल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते. त्याचा नागरिकांना त्रासच होतो. यावर पर्याय म्हणून ह्या पाण्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो का, त्याचा अभ्यास करून जर ते शक्य असेल तर त्याचा तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सेंट्रल एव्हेन्यूवर जी काही महत्त्वाची वाहनतळ आहेत, अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून रस्त्यावर साचणारे पाणी तिकडे वळून ते जमिनीत टाकता येईल का, त्याचीही चाचपणी करण्यास त्यांनी सांगितले. शहरातील उद्यानांच्या बाहेर साचणाऱ्या पाण्यालाही उद्यानात वळवून तेथील भूजल पातळी वाढविण्यावर विचार व्हावा जेणेकरून परिसरातील बोरवेल, विहिरी आदींची पाणी पातळी वाढून १२ महिने तेथे पाणी राहील. या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी असा एखादा प्रयोग करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
ड्रेनेज विभागाच्या पुनर्रचनेची गरज
नागपूर शहरात अनेक ठिकाणी नाल्या चोक होतात. काही ठिकाणी मनुष्यबळाने तर काही ठिकाणी मशीनने चेंबर क्लिअर केले जाते. मात्र, लोककर्म आणि आरोग्य विभाग (स्वच्छता) यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे बऱ्याचदा चेंबर स्वच्छ करण्यात अडचणी येतात. म्हणून ड्रेनेज विभागाची पुनर्रचना करण्याची गरज महापौर दयाशंकर तिवारी यांनी बोलून दाखविली.