मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सध्या देशभरातील सर्वसामान्य जनता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वैतागली आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाईतही भर पडल्याने जनतेचे बजेट कोलमडले आहे. यावर राज ठाकरेंनी ताजे व्यंगचित्र रेखाटले असून यात इंधन दरवाढीच्या रुपात खवळलेल्या समुद्राच्या उंचच उंच लाटा दाखवण्यात आल्या आहेत.
तसेच या समुद्रात भाजपाच्या रुपाने एक गलबत दाखवले असून या गलबतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि सामान्य जनतेचा एक प्रतिनिधी असे तिघे स्वार झाले आहेत. इंधन दरवाढीच्या लाटांमध्ये आपण बुडतोय की काय अशी भिती सामान्य व्यक्तीला वाटत आहे. तर दुसरीकडे त्याची भिती कमी करण्यासाठी ३ पैशांनी इंधनाचे दर कमी करीत, केले की नाही भाव कमी? असे मोदी सांगत आहेत. जनतेची अशा प्रकारे थट्टा करणारे मोदी-शाह घाबरलेल्या सामान्यांची मजा पाहत आहेत, अशा आशयाचे व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटले आहे.
राज ठाकरेंनी स्वतः रेखाटलेले नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.