सोलापूर – अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसेने काँग्रेस ऑफिसची तोडफोड केल्यामुळे आधीच वातावरण पेटलं असताना आता एमआयएमने या वादात उडी घेतली आहे. हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हानच एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका वारिस पठाण यांनी केली आहे. वारिस पठाण ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
‘राज ठाकरे बुझा हुआ दिया है. त्यांची महाराष्ट्रातली सत्ता संपली आहे. त्यांचा एक आमदार होता, तोही त्यांच्यासोबत नाहीये. महापालिकेत काहीच नाहीये. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे’, अशी टीका वारिस पठाण यांनी केली.
‘जर त्यांना वाटतं फेरीवाले चुकीच्या पद्धतीने बसत आहेत तर मग का नाही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत ? पोलीस ऐकत नसेल तर न्यायालायत जावा. पण नाही गरीब लोक जिथे बसतात तिथे जाऊन तोडफोड करतात. गरिबावर हल्ला करुन दाखवतात, आमच्या येथे भायखळ्यात येऊन तोडफोड करुन दाखवा’, असं आव्हान; वारिस पठाण यांनी दिलं आहे.