मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना बिनशर्त पाठिंबा दिला. यामागील भूमिका सांगताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी माझ्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहेत, हे फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले.
केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.