नवी दिल्ली: संसदेचे वरिष्ठ सभागृह असणा-या राज्यसभेत आज महाराष्ट्रातील ६ खासदारांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ घेतली.
राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय मंत्री व सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते. शपथ घेणा-यांमध्ये महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदार सर्वश्री नारायण राणे, कुमार केतकर आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह पुन्हा राज्यसभेवर निवडून आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे.
खासदार सर्वश्री वंदना चव्हाण, अनिल देसाई यांनी मराठीत शपथ घेतली. तर, प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून आणि कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.
देशातील १६ राज्यांमधून एकूण ५८ सदस्य राज्यसभेवर निवडून आले असून महाराष्ट्रातील ६ सदस्यांचा यात समावेश आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ पर्यंत राहणार आहे.