नागपूर: उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भात प्रभु श्रीरामचंद्रांची जयंती रामनवमी मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. राम भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरांकडे मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शहरातील पोद्दारेश्वर राममंदिर, रामेश्वर मंदिर, वडधामना राममंदिर, आणि इतर प्रमुख राममंदिरांमध्ये भक्तांची मोठी रांग लागली होती.
प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, त्यावेळी संपूर्ण मंदिर परिसर “जय श्रीराम”, “सिया रामचंद्र की जय”, “रामलल्ला की जय” अशा घोषणांनी दुमदुमून गेला. मंदिरांमध्ये प्रभु रामचंद्राच्या प्रतिमेची आणि मूर्तीची विशेष सजावट करण्यात आली होती. सुवासिक फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजवले गेले होते.
रामजन्माच्या क्षणी शंखनाद, घंटानाद आणि वेदमंत्रांच्या उच्चारात विशेष महाआरती करण्यात आली. भक्तांनी भगवान श्रीरामाला फळं, मिठाई, आणि तुळशी पत्र अर्पण केले. अनेक ठिकाणी रामायण पठण, सुंदरकांड पारायण आणि भजन संध्यांचे आयोजन देखील करण्यात आले.
काही ठिकाणी बाल रामाच्या स्वरूपात सजवलेली झांकी प्रदर्शित करण्यात आली होती, जिथे लहान मुलांनी रामायणातील प्रसंगांचे अभिनय सादर केले.
नागपुरात भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन –
शहरातील पोद्दारेश्वर राममंदिरापासून भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नागपूर शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूणच, नागपूर व विदर्भ रामभक्तांनी प्रभु श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाला भक्तिभावाने आणि आनंदाने साजरे करत राममय वातावरण निर्माण केले आहे.