नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे यांनी अर्ज दाखल केला. त्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल हेही उपस्थित होते.
गेल्या 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापतीपदावर प्रा.राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कारण महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. अध्यक्षपदासाठी १९ डिसेंबरला निवडणूक होणार आहे.
रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ 7 जुलै 2022 रोजी संपल्याने या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजप नेते राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा झाला असला तरी अद्यापही काही महत्त्वाच्या पदांची मागणी शिंदेसेनकडून करण्यात आली होती.
यामध्ये विधान परिषदेच्या अध्यक्षपदाचाही समावेश होता. विधान परिषदेचे एकूण गणित पाहिल्यास भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने राम शिंदे यांचे नाव दिले.राज्यपालांनी पाठवलेल्या वेळापत्रकानुसार बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे होते. शिंदे यांनी सकाळी अर्ज दाखल केला. त्याचवेळी महाविकास आघाडीने उमेदवार न देण्याची भूमिका घेतली.