नागपूर : दलित समाजासाठी काम करतांना दलित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम रामदास आठवले यांनी केले असून दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवलेंनी पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आज नागपूरच्या सिविल लाईन्स स्थित चिटणवीस सेंटर येथील बनयान सभागृहामध्ये गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या पुरस्काराच स्वरूप पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील स्मारक, मुंबईच्या इंदू मिलच्या जागेत साकार होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या प्रकल्पांसाठी रामदास आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे सामाजिक आणि राजनीती कार्य हे मोठे आहे असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले. सामाजिक ,राजकीय, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम गिरीश गांधी करत असल्याचे देखील गडकरी यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी सांगितले की, मी दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ,साहित्यिकांच्या चळवळीतून पुढे आलो असून आम्हाला समाजामध्ये प्रॅक्टिकल आंबेडकरीझम – व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे . संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण, गोलमेज परिषदेतील भाषण आजही लोकांच्या लक्षात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व रुजवण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्थातून सुमारे 1 लाख विद्यार्थी अनेक विद्याशाखेंमध्ये शिक्षण घेत असल्याचे देखील आठवले यांनी सांगितले .
या कार्यक्रमाला मारवाडी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते