मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाची साथ सोडली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाबा सिद्दीकी पोस्टमध्ये म्हणाले की,मी लहान वयातच काँग्रेसशी जोडला गेलो. गेल्या ४८ वर्षांपासून मी पक्षात होतो. माझा हा प्रवा मी थांबवतो आहे. कारण आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
तातडीच्या प्रभावाने मी हा राजीनामा दिला आहे. खरंतर मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या पण म्हणतात ना काही गोष्टींबाबत शांत राहिलेलं बरं. त्यामुळे मी शांत आहे. मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अशी पोस्ट लिहून बाबा सिद्दीकींनी काँग्रेस पक्षातून काढता पाय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण :-
बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. पण याबद्दल बाबा सिद्दीकी यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सिद्दीकी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी विजय मिळवला. २००४ ते २००८ या कालावधीत ते राज्यमंत्री राहिले. आमदार होण्यापूर्वी ते दोन टर्म नगरसेवक होते. १९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडून गेले. १९९७ मध्येही ते पालिकेची निवडणूक जिंकले होते.