नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व नेते मंडळी आपल्या मतदासरसंघाची ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागले आहे.अद्यापही सत्ताधारी शिंदे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. यातच आता रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार कृपाल तुमाने यांना डावलून दुसरा उमेदवार लादल्यास आम्ही काम करणार नाही, असा थेट इशारा शिंदे सेनेचे पदाधिकारी व तुमाने यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
रामटेक मतदासंघातून यंदा शिंदे गटाकडून उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र याला स्थानिक तुमाने समर्थकांनी विरोध दशविला. आपल्याकडे उमेदवार असताना दुसऱ्याची गरजच काय असा सवाल मुख्यमंत्र्यांना फोनवरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांनी केला.
रामटेक मतदासंघात कृपाल तुमाने यांची ताकद आहे.
भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने केवळ तुमाने यांना विरोध दर्शवण्यासाठी राजू पारवे यांची सोय केली जात असल्याचा आरोपही इटकेलवार यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी उमेदवार बदलणार नसल्याचे आश्वासन आम्हाला दिल्याचे इटकेलवार म्हणाले. खासदार तुमाने यांना डावलल्यास आम्ही निवडणुकीत काम करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.