नागपूर : मार्च २००७ मध्ये विशाल पैसाडेली (वय ३२) नामक गुन्हेगाराचा अपघात झाला होता. तो अपघात नसून त्याची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या करण्यात आली होती, अशी खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या हत्याकांडाच्या कटकारस्थानात दुसरा एक गँगस्टर राजू भद्रे याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
२२ मार्च २००७ मध्ये विशाल पैसाडेली (रा. कमसरी बाजार, कामठी) याचा मौदा वाळेगाव शिवारात अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता. अपघातातील आरोपी कारचालक गौरव झाडे याला अटक करण्यात आली होती. त्याने कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची कबुली दिली होती. मात्र हा अपघात नसून रणजित सफेलकर आणि राजू भद्रे यांनी घडवून आणलेली हत्या असल्याचे आता १३ वर्षांनंतर उघड झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशालची रणजित सफेलकरच्या नात्यातील एका महिलेशी मैत्री होती. ती माहीत झाल्यामुळे रणजित कमालीचा खवळला होता. विशालला रणजितच्या पापाची इत्थंभूत माहिती होती. त्यामुळे त्याची हत्या केल्याचे उघड झाल्यास बरेच गुन्हे उघड होण्याची भीती होती. त्यामुळे रणजितने विशालचा काटा काढण्यासाठी मोठे कटकारस्थान रचले. त्यात आरोपी संजय भद्रे, श्रीकांत ऊर्फ भैया सांभारे, हेमंत गोरखा आणि तुषार दलाल यांना सहभागी करून घेतले. ठरल्याप्रमाणे रणजितने विशालला एका कामाच्या निमित्ताने खापरखेड्याकडे पाठविले. त्याचा पाठलाग करून आरोपींनी राजू भद्रेच्या स्कॉर्पिओने विशालला चिरडले आणि तो अपघातात मृत झाल्याचा कांगावा केला. दरम्यान, तत्कालीन पोलिसांनी या अपघाताची बारकाईने चाैकशी केली असता सफेलकर, भद्रेच्या सांगण्यावरून गाैरव झाडेने या अपघाताचा आरोप स्वीकारून सरेंडर केले होते. बदल्यात सफेलकरने गौरवला ५० हजार रुपये दिले आणि जामीन तसेच कोर्टकचेरीसाठी येणारा खर्च केला. या प्रकरणातून आरोपी गौरव झाडेची निर्दोष सुटका झाली, हे विशेष.