ऑनलाईन विक्री कंपन्यांचे मायाजाळ, ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवी शक्कल.
नागपूर: सध्या सर्वत्र ऑनलाईन खरेदीचा ज्वर वाढला आहे. यातच आज ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून त्यासंबंधी रेटिंग घेणे किंवा रिव्यू मागणे सुरू केले. अनेकजण रेटिंग देतात, रिव्यू पण लिहितात. परंतु आता ऑनलाईन विक्री कंपन्यांकडून त्यांचे प्रतिसाद नसलेले उत्पादने विक्रीसाठी किंवा प्रतिस्पर्धी कंपन्यांचे सर्वाधिक खप होणाऱ्या उत्पादनाची विक्रीत घट करण्यासाठीही फेक रिव्यू व रेटिंगचाही वापर होण्याची शक्यता बळावली आहे. उत्पादन किंवा सेवेबाबत रेटिंग किंवा रिव्यू आता सायबर सुपारीचे नवे अस्त्र ठरण्याची चिन्हे आहेत.
वेगवेगळ्या ऑनलाईन कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवी शक्कल शोधण्यात येत आहे. एखाद्या ग्राहकाने ऑनलाईन उत्पादन खरेदी केल्यानंतर त्याला तत्काळ लिंक पाठवून त्यावर उत्पादनाबाबतचे रेटिंग किंवा रिव्यू मागितला जातो. यात अनेकजण उत्पादन आवडल्यास ओके, गुड असा शेरा मारून रिव्यू देतात तर काही ठिकाणी ३, ४, ५ स्टार असे रेटिंग देत असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. तेच उत्पादन दुसरा एखादा ग्राहक खरेदी करण्यापूर्वी त्या उत्पादनाबाबतचे रिव्यू, रेटिंग बघतो. अनेक ग्राहक अशाप्रकारे ऑनलाईन खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. अर्थातच रेटिंग व रिव्यू चांगला असला तर ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीकडून संबंधित उत्पादनाला मागणी वाढते. ऑनलाईन खरेदीच नव्हे तर हॉटेल, जिम, बॅंकिंग, ट्रॅव्हल्ससारख्या सेवा दिल्यानंतर रेटिंग देण्याचा आग्रह संबंधित प्रतिनिधीकडून धरला जात आहे.
अऩेकजण रेटिंग देऊन मोकळे होतात. परंतु याच रेटिंगचा फायदा या कंपन्यांना होतो. नेमके लाभाचे हेच सुत्र धरून आता विविध ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या तसेच सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी फेक रेटिंग व रिव्यूचा वापर होण्याची शक्यता आहे. किंबहुना एखाद्या कंपनीची विक्री पाडण्यासाठी किंवा स्वतःच्या कंपनीच्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी याचा वापर कंपन्यांकडून होण्याची शक्यता पारसे यांनी व्यक्त केली. यात दोन्ही प्रक्रियेत ग्राहकांचे नुकसानच नव्हे तर फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. अनेकदा ग्राहकांकडून चांगले रिव्यू व रेटिंग मिळवण्यासाठी उत्पादनासोबतच कॉम्प्लिमेटरी गिफ्टही दिले जाते. यातून अनेकजण चांगले रिव्यू व रेटिंग टाकतात. याशिवाय पैसे देऊन रिव्यू व रेटिंग टाकणारेही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. या पेड रिव्यू व रेटिंगचाही मोठा बाजार उदयास येत असून सामान्य नागरिकांचीच यातून फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोशल मिडियावर घर बसल्या काम करून पैसे कमवा, पार्ट टाईम पैसे कमवा, असे मेसेज दिसतात. या कामात बरेचदा पेड व फेक कस्टमर रिव्यू, रेटिंग देण्याची जबाबदारी संबंधितांवर असते. हेच फेक रिव्यू व रेटिंग इतर ग्राहकांनाही फारवर्ड केली जाते. याचा एखाद्या उत्पादनासाठी सकारात्मक व नकारात्मक वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून सामान्य नागरिकांचीच फसवणूक होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी रिव्यू व रेटिंगचा आधार घेऊन खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या सद्सद् विवेक बुद्धीचा वापर करावा.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com