Representational pic
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटेची छपाई थांबविली असल्याची माहिती आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी दिली.
देशात सामान्यपणे व्यवहारामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांनी व्यवहार करणे सोपे जाणार आहे .
गेल्या आठवड्यात देशातील चलन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. देशातील ८५ टक्के एटीएम सुरळीत असल्याचे दिसून आले आहे. एकूणच परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, असंही गर्ग यांनी नमूद केलं.
सध्या दोन हजार रुपयांच्या सात लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात आहेत. हे प्रमाण पुरेसे आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आली आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये छोटे व्यवहार करण्यात अडचणी येतात. त्यामुळे कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध करून देण्यासाठी सध्या दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. अतिरिक्त रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी पाचशे रुपयांच्या चलनातील नोटांची छपाई दररोज तीन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे गर्ग यांनी नमूद केले. तसंच देशामध्ये नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, अतिरिक्त मागणीही पूर्ण केली जात आहे, असं गर्ग म्हणाले.