नागपूर: कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता ‘वनामती’ ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथील ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृहा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अनिल महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, अप्पर मुख्य सचिव विजय कुमार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे, वरिष्ठ प्रशासन अधिकारी सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.
वनामतीच्या माध्यमातून कृषीविषयक व प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण विविध गटांना देण्यात येते. आज सर्वात जास्त प्रशिक्षणाची आवश्यकता कृषी क्षेत्राला असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वातावरणाच्या बदलामुळे कृषी क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे येत आहेत. जोपर्यंत कृषी क्षेत्राला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राला स्थैर्य प्राप्त होणार नाही. हवामानाचा वेध, जमीन तसेच पाण्याचे परिक्षण यासारख्या बाबींचे योग्य प्रशिक्षण दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. शासकीय योजना आणि नव तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आणि त्याचा त्यांच्या शेतात वापर होणे हे अत्यंत गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील संबंधितांना प्रशिक्षण दिल्यास निश्चितच उत्पादकता वाढून उत्पन्नात भर होईल. वनामतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अधिकारी तसेच शेतकऱ्यांना नवीन पध्दतीने प्रशिक्षणे देणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विदर्भाचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दुरदृष्टीने शेती व जलसंधारण क्षेत्रात बहुमोल कार्य केले. परंतु त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. आज महाराष्ट्रात ‘जलयुक्त शिवार योजना’ यशस्वीरित्या राबविल्यामुळे पाण्याची पातळी 5 मीटरपेक्षा वर गेली आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या मराठवाडयात देखील गाळयुक्त अभियानामुळे पाण्याची पातळी 3 मीटरने वर गेली आहे. जलसंधारणामुळे रब्बीचे उत्पादन वाढले असून शेतीकरी वर्ग फळबागांकडे वळला आहे.
राज्याला मोठ्या धरणापेक्षा जलसंधारणाची गरज आहे. ही संकल्पना वसंतराव नाईक यांनी त्याकाळी रुजविली होती. दुरदृष्टी ठेवून त्यांनी जनसामान्यांकरिता कार्य केले. ‘महाराष्ट्राला मी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल’, अशी गर्जना करणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या नावाने हे सभागृह आहे, ही बाब निश्चितच समाधानाची आहे. वनामतीमध्ये सुसज्ज ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृहा’ची निर्मिती करण्यात आली. यासाठी सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनामतीच्या सुसज्ज अशा वसंतराव नाईक सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण करुन उद्घाटन केले. वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात वनामतीच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञांमार्फत शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण आयोजित केल्या जाईल. याचा फायदा निश्चित कृषी क्षेत्राला होईल, असे सांगितले. वनामतीच्या विविध ध्येय-धोरणाविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली.
वनामतीच्या सभागृहाच्या निर्मितीसाठी माजी संचालक विजय घावटे, गिरीष मानापुरे, अभियंता सुरेश बोरीकर, कलावंत निलेश इंगळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कृषी सहाय्यकांनी तयार केलेल्या ‘कृषी मोबाईल ॲप’चे विमोचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर तर आभार वनामतीचे उपसंचालक जगन राठोड यांनी मानले.