नागपूर – केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत्वाने होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला. यात महाराष्ट्रातील ४४ तर नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नागपूरमधील गोधनी रेल्वे स्थानाकाचेही पुर्ननिर्माण होणार आहे. त्यानिमित्ताने गोधनी येथे ना. श्री. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, डीआरएम तुषारकांत पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. काटोल, नरखेड येथून मोठ्या प्रमाणात लोक नागपूरला येतात.
या स्थानकांवर जास्तीत जास्त गाड्यांना थांबा मिळेल तेव्हा ग्रामीण भागातील लोकांची विशेष सोय होणार आहे, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. ‘या योजनेंतर्गत काटोल, नरखेड आणि गोधनी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. याठिकाणी चांगली रेल्वे स्थानके झाल्यानंतर गाड्यांना थांबा मिळेल. त्यामुळे स्थानिकांना मुख्य रेल्वे स्थानकावर जाण्याची गरज पडणार नाही.
त्यादृष्टीने उत्तम नियोजन करण्यात आले आहे. मुख्य रेल्वे स्थानकानंतर अजनी आणि गोधनी ही दोन उपस्थानके म्हणून नावारुपाला येतील,’ असे ते म्हणाले. ‘नागपूर येथून अमरावती, गोंदिया, वर्धा, नरखेड, वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिला आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,’ अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली. रेल्वे स्थानके विकसित करताना चांगले रस्ते, पार्किंगची व्यवस्था याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी दीड हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानींचा सत्कार करण्यात आला.