नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता नोंदणी सुरू झाली आहे. गुरूवारी २५ मे रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी प्रकल्पाचे पत्रक जारी केले व ऑनलाईन प्रक्रियेचा शुभारंभ केला. आयुक्तांनी प्रकल्पाच्या स्थळी भेट देउन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, विकासक श्री. गौरव अग्रवाल, कंपनीचे सीईओ उन्मेश धोटे आदी उपस्थित होते.मौजा वांजरा, कामठी रोड येथील ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पामधील ४८० सदनिकांकरिता मनपाच्या www.nmcnagpur.gov.in याअधिकृत संतेस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. 25 जून २०२३ पर्यंत अर्ज करता येणार असून शहरातील गरजूंनी या प्रकल्पातील घरांकरिता नोंदणी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्न निकेतन’ या प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत १९ मार्च २०२३ रोजी भूमिपूजन झाले होते. या प्रकल्पाचे कार्य सुरू झाले असून या प्रकल्पांतर्गत ४८० सदनिकांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत.
सदनिकेची एकूण किंमत ११,५१,८४५ एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य ९,०१,८४५ रूपये आहे. सदनिका खरेदी करण्याकरिता अर्ज नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आलेला आहे. अर्जाचे शुल्क २००० रुपये (ना परतावा) ऑनलाईन जमा करावे लागेल. सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. वाटपाचे अटी व शर्ती आणि अर्ज भरण्याकरिता आवश्यक माहिती www.nmcnagpur.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करते वेळी कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, कुटुंबातील व्यक्तींचे रेशनकार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड
यापैकी कोणतेही, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, चालु मोबाईल क्रमांक व इतर दस्तावेज बाळगणे आवश्यक आहे. प्रकल्पातील ४८० सदनिकांमध्ये ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणा-या पंपला लागणा-रा वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर उर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण प्रकल्पाची सुविधा आहे.