नागपूर : शहरातील बेसा परिसरात घरकामाच्या नावाखाली ११ वर्षीय चिमुकलीचा अमानुष छळ आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास नियमांनुसार महिला अधिकाऱ्याकडे देण्यात न आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता अखेर हुडकेश्वरचे ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून तपास काढण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत.
माहितीनुसार, अथर्वनगरीत अरमान खान याच्या घरात २०२० सालापासून घरकाम करणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीला आरोपी अरमान त्यांची पत्नी हिना व मेहुणा अजहर मारहाण करायचे व अजहर-अरमानने तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले. पोलिसांनी या प्रकरणात ३१ ऑगस्ट रोजी अरमानला अटक केली. त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली, तर अरमानचा मेहुणा अजहर यालाही सोमवारी अटक करण्यात आली. हिना खानलाही लवकरच अटक करण्यात येणार आहे.
नियमानुसार लहान मुलीचा विषय असल्याने महिला पोलिस अधिकाऱ्याकडे तपास सोपविणे अपेक्षित होते. मात्र,याप्रकरणात तसे झाले नाही. यावर यावरून नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनदेखील देण्यात आले. त्यानंतर राजपूत यांच्याकडून तपास काढत गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.